top of page

नाटक चारचौघी 

चारचौघी नाटकाला दिलेल्या भरगोस प्रतिसादाबद्दल मंडळ आपले आभारी आहे, नाटकाच्या आणि मित्रमंडळाने आयोजित केलेल्या ह्या कार्यक्रमाचे काही अभिप्राय 

चारचौघी अभिप्राय.....
           हे नाटक मी १९९१मधे अर्ध बघितलं होतं. पहिल्या अंकांनंतरचे फक्त संवाद बाहेरून म्हणजे दाराला कान लावून सात महिन्याच्या मुलीला कडेवर झोपवत ऐकले होते. काल हे नाटक बघून  भारावल्यागत झाले. कथा, संवाद, दिग्दर्शन, अभिनय, नखशिखांत देहबोली, शब्दफेक, ह्या सर्वाबद्दल बोलायचे झाले तर अफलातून हा एकच शब्द आठवतो. 
          संपूर्ण नाटक अतिशय प्रभावी होतं. पण मला मनापासून आवडलं व अतिशय परिणामकारक वाटलं ते एकच दृष्य.....
           नटाने संवाद बोलताना किंवा काही विशिष्ट हालचाली वगळता इतर वेळेस प्रेक्षकांकडे पाठ करू नये हा सर्वसाधारण अलिखित नियम. पण दिग्दर्शकाने त्या नियमाचा अतिशय सुंदर व प्रभावी  वापर केला आहे हे प्रकर्षाने जाणवले. 
           मी मनस्विनी, मी मानिनी, माझं अस्तित्व मी जपणार, समाजाचा विचार न करता माझे निर्णय मी घेणार, जीवन कसं जगायचं हे माझं मी ठरवणार हे बोलताना लहानी मुलगी सभागृहाकडे पाठ करून उभी असते. म्हणजे समाजमानसाकडे पाठ फिरवून ती उभी आहे हाच त्यातून अर्थबोध होतो. लोकं रुढी परंपरा ह्यांच भय आता मला नाही. हाच जबरदस्त संदेश दिला आहे. त्यामुळेच ते दृष्य मला संपूर्ण नाटकात फार भारी वाटलं हे  मनापासून सांगावसं वाटतं. आता  ते दृष्य सादर करण्यामागे दिग्दर्शकाचा काही दुसरा हेतू असेल तर मला समजून घ्यायला आवडेल.
          कालचं नाटक म्हणजे आम्हा सर्वांना एक पर्वणीच होती. मित्रमंडळ धन्यवाद. 
सौ. विद्या चिडले. 

एका लेखकाला, नाटककाराला, कवी ला दूरदृष्टी हवी म्हणतात ते अगदी तंतोतंत पटलं जेंव्हा मी "चारचौघी" हे नाटक पाहिलं. ३०/४० वर्षांनंतरचा समाज कसा असेल आणि त्या भविष्यातल्या समाजाला वर्तमानात आव्हान देणार्‍या चारचौघींची ही गोष्ट जेंव्हा एक पुरुष लिहितो तेंव्हा त्याचा भाव आणखी प्रभावी पणे पोचतो.

स्त्री ही कुणाची आई,बहीण, पत्नी, मुलगी असली तरीही तीच स्वतः च एक अस्तित्व आहे आणि स्वतःच्या अस्तित्वाला सर्वपरी ठेवण्याचा तिचा मूलभूत हक्क आहे हा विचार एका व्यक्तीकडून नाही तर एका कुटुंबाकडून मिळतो.

दिग्दर्शकांनी या नाटकातून एक घर, एक कुटुंब आपल्यासमोर उभं केलं. नेपथ्य, प्रकाशयोजना, पार्श्वसंगीत आणि सर्व कलाकारांचा अभिनय या सगळ्यांची वीण ईतकी उत्तम विणली गेली आहे की कोणताच धागा उसवण्याचा प्रश्नच येत नाही. 

आपल्याला आयुष्यातल्या विवंचना मांडताना, त्यातून स्वतःला सावरून स्वतःच्या अस्तित्वासाठी चा लढा देतानाचा रोहिणी ताई,  मुक्ता, कादंबरी आणि पर्ण यांची देहबोली, हावभाव आणि आवाजातील चढ उतार हे अगदी कसलेल्या कलाकारांची ग्वाही देऊन जातात तर या चारचौघींच्या आयुष्यातला उलथापालथ करणारे पुरुष म्हणजे निनाद, श्रेयस आणि पार्थ यांच्या कामामुळे चारचौघी प्रभावी पणे आपल्या समोर येतात याला दुमत नाही.

सामन्यातल्या असामान्य अशा या चारचौघींची गोष्ट नाटय़रुपात पाहायला मिळणं म्हणजे दृकश्राव्य पर्वणीच म्हणावी लागेल.

✍🏻 अ‍ॅड. मधुरा ओगले  - देव.

मूळ नाटकाची संकल्पना आईने घेतलेला वेगळा निर्णय आणि त्या पार्श्वभूमीवर तीन मुली त्यांच्या नातेसंबंधात आलेले वेगवेगळे प्रश्न हाच आहे.  
दोन अडीच तासाच्या नाटकात तीन वेगळे प्रश्न मांडण्यात आले आहेत हे खरं पण लेखकाने सगळ्या प्रश्नांवर उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला नाही हेही महत्त्वाचं. 
And a lived happily ever after हा नाटकाचा शेवट नाही.
विद्याचा घटस्फोट आणि हरलेली केस किंवा विनी न दोघांना नाही म्हणणं ही पुढच्या प्रश्नांची फक्त सुरुवात आणि वैजू ने घेतलेला निर्णय ही तर पुढच्या आयुष्यभराची लढाई,.  प्रत्येकाला आपली लढाई लढून आपल्या निर्णयाची जबाबदारी घ्यावी लागते एवढाच मेसेज आहे हे मला सगळ्यात जास्त भावलं. 

मूळ नाटक थोडंसं एडिट करून अधिकच लहान केलंय त्यामुळे कमी वेळात गोष्टीचे अनेक पदर समोर आल्यामुळे काहीसं गुंतागुंतीचं नक्कीच वाटू शकत.
पण प्रत्येक व्यक्तिमत्वाला कहाणीचा पदर जोडला नसता तर गोष्ट अपूर्णही वाटली असती.
- गंधाली सेवक.

bottom of page