top of page

कोजागिरी दांडिया नाईट्स

मित्रमंडळासाठी नविन वर्षाची सुरवात होते ती गणपतीनंतर प्रथम येणाऱ्या कोजागिरी पौर्णिमेने!! बऱ्याच वर्षांनंतर यंदा मंडळाने कोजागिरी,भोंडला व दांडिया एकत्र साजरा करायचं ठरवलं. त्याला मित्रमंडळींनी न भूतो न भविष्यती अशी साथ दिली. ह्याला कारण तरूण, उत्साही कार्यकर्ते!! 

नुसते मित्रमंडळाचे सभासदच नव्हे तर त्यांच्या इतर अमराठी मित्र-मैत्रिणींनीही ह्या कार्यक्रमाला गर्दी केली. ECA club चा भलामोठा हॅाल कमी पडणार की काय अशी शंका वाटायला लागली. दिवस होता १३ ऑक्टोबर २०१९ .

 

मधुरा ओगले-देव हिने सूत्रसंचालनासाठी माईक हातात घेतला. परिश्रम पूर्वक सर्व मंडळी तयार होऊन आली होती. माहौल बनवायला जामानिमा तर हवाच!! उत्तमोत्तम साड्या, लेहंगे, दागिने व मॅचिंग साधून महिला वर्गाने कार्यक्रमाची शोभा वाढवली.

 

रूपाली गोखले, संगीता कार्लेकर, अपर्णा चेरेकर ह्या मैत्रिणींनी भोंडला आयोजित केला होता. पाटावर काढलेला हत्ती मधोमध ठेवला, भोंडल्याची काळाआड लपून गेलेली गाणी कडेवर घेतलेल्या चिमुरडीपासून, ऐंशीव्या  वर्षात पदार्पण करत असलेल्या राजनकर काकूंपर्यंत सगळ्यांनी फेर धरून म्हटली.

 

 

स्वप्ना सोमण, गौरी महाजन, मधुरा ओगले-देव, ज्योती जोगळेकर, स्नेहा कामटे, पल्लवी सावंत, दीपाली भामरे व अनघा बोडस ह्या सर्वजणींनी पारंपारिक वेशभूषेत ‘ओढनी उड उड जाय’ ह्या गाण्यांवर दांडिया सादर केला. हे ह्या संध्याकाळचं प्रमुख आकर्षण होतं. पल्लवी सावंत हिने हे नृत्य मेहनतीने बसवले होते. सगळ्यांनी नाचाचा सुंदर ताळमेळ साधला.

 

 

'स्वरनाद' ची मंडळी तर घरचीच! ‘शारद सुंदर चंदेरी राती, स्वप्नांचा झुलतो झुला’ म्हणत ज्योती कुलकर्णी आम्हांला जादुमयी दुनियेतच घेऊन गेली. 'धीरे धीरे चल चांद गगन में’ योगेश सेवक व लीना गोखले दोघांनी एकमेकांना अप्रतिम साथ देत गाणं सादर केलं. 'काय पो चे' सिनेमातले ‘ हे शुभारंभ’ नंतर ‘ढोल बाजे ढोल बाजे’ म्हणत  आभा जोगळेकरने हॉल दणाणून सोडला. 'मधुबन में जो कन्हैया किसी गोपी से मिले' हे 'लगान' सिनेमातलं गाणं ही अतिशय सुंदर रित्या सादर झालं. सगळेजण ह्या सर्व गाण्यांवर धमाल नाचत होते

 

 

पराग कर्वे, डी जे म्हणून कार्यरत होते. विना व्यत्यय गाणी सुरू राहीली व जमलेल्या मंडळींनी उत्फूर्त प्रत्यक्ष सहभाग घेऊन साथ दिली हे ही विसरून चालणार नाही!!\

 

सर्वोत्तम वेशभूषेचं पहिलं पारितोषिक श्री प्रमोद देवधर नी सौ प्राची देवधर ह्या पतिपत्निंनी पटकावलं. उत्कृष्ट जोडीचे पारितोषिक सायली पगारिया आणि अमृता लंकड ह्या दोघींनी पटकावले. श्वेता वाणी हिची उत्कृष्ट नृत्यासाठी महिलांमधून तर हितेश ठकराल ह्याची उत्कृष्ट नृत्यासाठी पुरुष वर्गातून निवड करण्यात आली.  

 

 

दिवाळी निमित्त अनेक स्टॉल्सही  लावले होते. नाच करून दमल्यावर शॉपिंगही करत होते सगळे. मंडळाने दिलेला अल्पोपहार, मसाले दूध व खूप रम्य आनंददायी आठवणी सोबतीला घेऊन पांगापांग झाली.

bottom of page