top of page

गणेशोत्सव २०१९

भजन अहवाल

४ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता मित्रमंडळ बंगलोर येथे 'ज्योतिर्मय' भजनी मंडळाचा कार्यक्रम सादर झाला. सौ. ज्योती कुलकर्णी यांचे हे मंडळ आहे. हे भजनी मंडळ गेली १५ वर्षे अव्याहत सुरू आहे. या भजन मंडळात भक्तिगीते, अभंग, गौळण, गोंधळ, जोगवा, विडा इत्यादी प्रकार म्हटले/शिकविले जातात.

या मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे ही सगळी भजने गात असताना, त्यातील शब्द, त्याचे अर्थ, त्यातील भाव याला खूप महत्त्व असते. ती भजने सुरेल असतात आणि त्यामुळेच ती श्रवणीय होतात. या कार्यक्रमात ज्योतीताई स्वतः पेटी वाजवून भजने म्हणतात. 

 

मित्रमंडळात सादर झालेल्या कार्यक्रमात श्री. नागराज यांनी तबला संगतही उत्तम केल्याने कार्यक्रम खूपच रंगला. गात असताना भगिनी स्वतःच टाळही वाजवतात, त्यामुळे कार्यक्रमाला रंगत येते. 

हा कार्यक्रम श्री गणरायाच्या समोरच सादर झाला त्यामुळे  छान वातावरण निर्मिती झाली.

श्री गणरायांची सेवा करण्याची संधी मित्रमंडळाने आम्हाला दिली त्याबद्दल ' ज्योतिर्मय' भजनी मंडळ खूप आभारी आहे.

बालकलाकारांचे विविध गुणदर्शन

मित्रमंडळाच्या गणरायाची प्रतिष्ठापना २ सप्टेंबरला मोठ्या भक्तिभावाने झाली. कलेचा आणि बुद्धीचा उपासक असलेल्या गजाननासमोर आमच्या बालकलाकारांनी आपली प्रतिभा सादर केली. 

 

सिंथेसाइजरवर निमिष बोडस, स्वरा बागुल व गिटारवर राजस आणि प्रणव अभ्यंकर यांनी आपली उत्कृष्ट कला दाखवली.

पर्णिका कदम हिने भरतनाट्यम या नृत्यशैलीद्वारे गणरायाला मानवंदना दिली. 

आदित्य जोशी याच्या riddles ने तर प्रेक्षकवर्गात धमाल आणली.संगीताच्या तालावर निमिष बोडस, राजस डहाळे आणि श्रद्धा कमते यांनी १५ मिनिटांत गणपतीचे सुंदर असे live acrylic painting बनविले. 

या छोट्या पण गुणी बालकलाकारांचे खूप खूप अभिनंदन व त्यांना भरभरून शुभाशीर्वाद. 

रेट्रो टू मेट्रो

यंदाच्या गणेश उत्सवात अनेक विविध छटांचे कार्यक्रम सादर झाले. सादरही झाले आणि श्रोतृवृंद व प्रेक्षकवर्गाने ते साजरेही केले. त्यापैकीच लोकांच्या मनावर ठसा उमटवून गेलेला कार्यक्रम म्हणजेच ‘स्वरनाद’ ने सादर केलेली गाण्याची मैफिल.

 

मित्रमंडळाच्या काही सदस्यांनी एकत्र येऊन सुरु झाला ‘स्वरनाद’. या स्वरनादाने आजवर अनेक वेगवेगळ्या संकल्पना घेऊन अतिशय उत्तमरीत्या आपल्या बाप्पासमोर सेवा सादर केली आणि श्रोत्यानां मंत्रमुग्ध करून सोडले. यंदाही स्वरनादची टीम आपल्या भेटीला आली ती एक वेगळीच संकल्पना घेऊन. एक अशी संकल्पना जी श्रवणीय तर होतीच पण त्याचबरोबर मेंदूला खाद्यही होती. संकल्पना होती ‘रेट्रो टू मेट्रो’ ची.

 

आजच्या भाषेत सांगायचं झालं तर या मैफिलीत एक ट्विस्ट होता. गायक,पेटी,तबला,वादक असा नेहमीचा ठेवणीतला कार्यक्रम न करता या कलाकारांनी ‘कराओके’ चा ट्विस्ट आणला होता. त्याचप्रमाणे गायक गातात आणि लोक नुसतं ऐकतात हे नेहमीचं समीकरण बदलून श्रोतृवृंदालाही या कार्यक्रमाचा हिस्सा बनवलं आणि कोडी घालून गाणी ओळखण्याचा खेळही चांगलाच रंगला.

 

गणरायाचे आवाहन करून चिन्मय यांनी स्वरनादचे सूर किती निरागस आहेत हे सर्वाना दाखवून दिले. त्यानंतर ज्योती यांनी ‘आईये मेहेरबा’ असं म्हणत प्रत्येकाला एका वेगळ्याच काळात नेलं. त्या काळात रमतो न रमतो तोच केदार यांनी ‘जबसे तेरे नैना,मेरे नैनोसे लागे रे’ म्हणत प्रेमातील डोळ्यांचं महत्व आम्हाला सांगितलं. खरं तर कुठलीच मैफिल पावसाच्या गाण्यांशिवाय पूर्ण होत नाही. या नियमाला धरूनच लीना व क्षितिज यांनी ‘आला आला वारा’ म्हणत येणाऱ्या पावसाची चाहूल दिली. नंतर योगेशनी घातलेल्या पहेली मधून ‘परिणीता’ मधील जॅझ स्टाईलचं पहेली गाणं म्हणून आभाने सर्वांचाच मनापासून वन्समोअर मिळवला.

त्यानंतर पूर्वीच्या काळी हिरो आपल्या हिरोईनला कसं पटवायचा हे योगेश यांनी ‘ये जवानी है दिवानी’ या गाण्यातून आम्हा सर्वांपर्यंत पोचवलं. अनायसे प्रेमगीतं चालू होती त्यातच केदार व क्षितिजा यांनी ‘सांग ना रे मना’ म्हणत घाबऱ्या जीवाचे मनाला प्रश्न विचारले. मग याच धाटणीच्या गाण्यामध्ये चिन्मयने सादर केलेलं ‘तुमने मुझे देखा’ तर केदार आणि लीना यांनी गायलेलं ‘सपनेमें मिलती है’ ही गाणी खरच खूप श्रवणीय होती. तर ‘जिया जलें’ गाणं म्हणून क्षितिजाने प्रेमाची एक दुसरी बाजू दाखवून दिली.

 

त्यानंतर लीना,योगेश यांनी सुरेल असं ‘ये रात भीगी भीगी’ हे गाणं सादर केलं. त्यानंतर ज्योती यांच्या सदाबहार लावणीने तर एक वेगळाच माहौल निर्माण केला आणि शिट्ट्यांच्या जोरावर वन्समोअर घेतला. ‘इशारो इशारो में’ म्हणत चिन्मय व क्षितिजा या जोडीने सर्वाना जागेवर खिळवून ठेवले तर आभा आणि ज्योती यांनी ‘भरे नैना’ म्हणत सर्वांच्याच डोळ्यांच्या कडा ओल्या केल्या. ‘यूँ ही चला चल राही’ म्हणत योगेश,केदार, चिन्मय आम्हाला आयुष्याच्या सफरीवर घेऊन गेले,तर तिथून परत आल्यावर लीना यांनी 'दिलबर दिलसे प्यारे दिलबर' म्हणत आमचे स्वागत केले.


या संपूर्ण मैफिलीचा शिरोमणी ठरला तो म्हणजे केदार यांनी गायलेले ‘अभि मुझमे कही बाकी थोडीसी है जिंदगी’ हे प्रत्येकालाच इमोशनल करून सोडणार गीत. सभागृहातील प्रत्येक माणूस डोळे बंद करून मनापासून हे गाणं ऐकत होता आणि हीच खरी त्या गाण्याची पावती होती आणि मग याच शांत वातावरणात मग ‘माउली माउली’ असा गजर झाला. गणरायाला वंदन करून सुरु झालेली मैफिल पांडुरंगाच्या चरणी येऊन संपली. कधी जुनी,कधी नवी,कधी प्रेमगीत तर कधी भावगीत अशी रोलर कोस्टर राईड आम्ही सर्वानीच अनुभवली आणि सर्वानाच ती आवडली.

महाप्रसाद

मित्रमंडळ बेंगळुरूच्या गणेशोत्सवातील महाप्रसादाचा दिवस म्हणजे उत्साह, वैविध्य यांची परिसीमा. या  वर्षी ८ सप्टेंबर रोजी साजरा झालेला हा दिवस उपस्थितांच्या नक्कीच लक्षात आणि अनुपस्थितांनी काय गमावले हे लक्षात रहावे म्हणून हा रिपोर्टचा प्रयत्न! 
 

या वर्षी सेवानिवृत्त  एअर मार्शल पी. पी. खांडेकर सर आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. बरोबर १०.१५ वाजता खांडेकर सर सपत्नीक ओडूकत्तूर मठात उपस्थित होते.

श्री गणेशाला वंदन करून व श्रींची आरती करून पुढील कार्यक्रमाला सुरुवात झाली. श्वेताने कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले. श्री परेश यांनी मित्रमंडळाच्या मागील वर्षभरात झालेल्या कार्यक्रमांची झलक दृक्श्राव्य माध्यमातून पडद्यावर छान दाखविली. हा नवीन विचार नक्कीच स्तुत्य आहे. 

 मावळत्या अध्यक्षा नीना वैशंपायन यांनी आपल्या सुसूत्र भाषणातून वर्षभराच्या कार्यक्रमांचा, मित्रमंडळाच्या वाटचालीचा आढावा घेतला. पुढील वर्षांची जबाबदारी शशिकांत काळे यांच्याकडे सुपूर्त केली.


सर्व कार्यकारी मंडळाला व्यासपीठावर बोलावून त्यांचे कौतुक करण्यात आले. भगवे फेटे घातलेले सर्वच कार्यकारी मंडळांचे सदस्य वर्षभराच्या कामाच्या जबाबदारीच्या पूर्ततेने आणि नवीन वर्षाचे स्वागतोत्सुक असल्यामुळे जास्तच डौलदार दिसत होते.


१० वी व १२ वीच्या परीक्षेत उत्तम यश मिळवणाऱ्यांना पारितोषिके देण्यात आली. तसेच या वेळचा माननीय श्री. शरद द्रविड पुरस्कार कु. अनीश चेरेकर याला देण्यात आला.  राज्यस्तरावर त्याने Athletics मध्ये कांस्य पदक मिळवले.


अनेक वर्षांची परंपरा कायम राखत मित्रमंडळाच्या २०१९ सालच्या स्मरणिकेचे प्रकाशन प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते झाले. 
लेख, कविता, जाहिराती, मुलांचे साहित्य, चित्रकला अशा विविधतेने नटलेल्या स्मरणिकेचे या वेळचे वैशिष्ट्य म्हणजे प्रसिद्ध सुलेखनकार, कलाकार श्री. अच्युत पालव सरांनी काढलेले मुखपृष्ठ! 
स्मरणिका संपादक राधिका, सारंग व विशेष साहाय्य करणारी गंधाली यांचे मनापासून कौतुक आणि आभार! 
लेख स्पर्धेत यश मिळवणाऱ्या मानसी आणि मधुरा यांना पारितोषिके देण्यात आली. लेख स्पर्धेचे परिक्षक म्हणून काम पाहणाऱ्या अपर्णा जोगळेकर व स्नेहा केतकर यांचाही सत्कार करण्यात आला. 

 


यानंतर सगळ्यांचे डोळे ज्या कार्यक्रमाकडे लागले होते त्या मित्रमंडळाच्या लेझीम पथकाने खास वऱ्हाडी भाषेतील “पयल नमन...” या गाण्यावर लेझीम सादर केले. खास नऊवारी साडीत, पारंपरिक आभूषणांनी नटलेल्या सुंदर ललना, धोतर-कुडता घालून नृत्य करणारे संगमनेरकर, सारंग असा २० जणांचा लेझीमचा ताफा म्हणजे सगळ्या रंगांची उधळण होती. 


शब्द, स्वर, ताल यांचा उत्कृष्ट मिलाफ, वेगवान, लयपूर्ण हालचाली यांच्या जोरावर लेझीम पथकाने साऱ्यांची मने जिंकून घेतली व ‘घालीन लोटांगण’च्या तालावर प्रेक्षकांना ठेका धरायला लावला. २५ ते ६५ वयोगटामधील सर्वांकडून उत्तम लेझीम नृत्य बसवून, सादर करून घेतल्याबद्दल पल्लवी व अनुष्का यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच! भगवे ध्वज व बाल गणपती ‘मिहीका’ यांनी लेझीम नृत्याला अधिकच उठाव आणला. 

यानंतर सेवानिवृत्त एअर मार्शल खांडेकर सरांची मुलाखत गंधालीने घेतली. भारतीय सैन्यातील वेगवेगळे हुद्दे ,त्यांचा चढता क्रम, निवडीचे निकष इत्यादी अनेक गोष्टी, तसेच peace time मध्ये चालणारे training, कारगिल युद्धाची पार्श्वभूमी व नियोजन याबद्दलची महत्त्वपूर्ण माहिती खांडेकर सरांनी सांगितली. भारतीय सैन्यदलातले intelligence चे महत्त्व,

 

अत्याधुनिक लढाऊ विमाने, शस्त्रास्त्रे यांची उपयुक्तता व वापर, nuclear nations ची मनोभूमिका यासारख्या विषयांची माहिती गंधालीने अचूकपणे विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरांच्या स्वरूपात खांडेकर सरांनी छानच सांगितली. 
मुलाखत आणि प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तरे यात सुमारे दीड तास कधी संपला कळलेच नाही. सरांच्या पत्नी सौ. मनिषा  खांडेकर यांच्या सैन्यदलाशी निगडीत समाजकार्याचा थोडक्यात माहिती देण्यात आली.

 

मुलाखतीनंतर सात्विक, रुचकर मराठी पद्धतीच्या जेवणाचा सर्वांनी आस्वाद घेतला. नंतर आरती करून जड मनाने सर्वांनी बाप्पाला निरोप (विसर्जन ) दिला. पुढील वर्षाचे मनसुबे रचत सगळ्या मित्रमंडळींनी एकमेकांचा निरोप घेतला.

 

॥ गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या॥

संत कान्होपात्रा

मित्रमंडळातर्फे गणेशोत्सवात विविध कार्यक्रम सादर केले जातात. दिनांक ७ सप्टेंबर रोजी ‘गंधर्व कला केंद्रा’तर्फे श्रीमती अर्चना बक्षी यांनी ‘संत कान्होपात्रा’ या संगीत-नृत्य-नाट्याचा सुंदर आविष्कार सादर केला. अनेक कलाकारांचा सुंदर मेळ यात साधला होता.

अर्चना बक्षी यांच्या निवेदनातून संत कान्होपात्राचा जीवनपट हळूहळू उलगडत जातो. तिच्या लहानपणापासून ते ती ईश्वरचरणी विलीन होईपर्यंतच्या प्रत्येक अवस्थेचे चित्रण वेगवेगळ्या कलाकाराने फार समर्थपणे सादर केले.

 

नृत्य-गायनाचे शिक्षण घेणारी छोटी कान्होपात्रा,विठ्ठलाच्या भजन-पूजनात दंग राहून नायकिणीचे जीवन जगण्यास नकार देणारी कान्होपात्रा,विठ्ठलाचे भजन-पूजन करता करता त्याच्या चरणी लीन होणारी कान्होपात्रा आणि विठ्ठल मंदिरातील खांबाजवळ उभी राहून आजही आपली ओळख देणारी कान्होपात्रा.

 

इतर पात्रांनी आपापल्या भूमिका तितक्याच समर्थपणे सादर करून त्यांना उत्तम साथ दिली.

bottom of page